कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व साखर कारखाना प्रशासन आणि कामगारांच्या वादावर आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा काढण्यात आला. इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथे आमदार पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या कारखाना प्रशासन व कामगारांच्या संयुक्त बैठकीत ‘अथर्व’चे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी मागण्या मान्य केल्या. कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार यांनी तोडगा मान्य असल्याचे सांगून उद्या (१३ नोव्हेंबर) सकाळी कामगार शिफ्टनुसार कामावर हजर होतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे दोन दिवसांपासून थांबलेली कारखान्याची चाके व तोडणी, वाहतूक यंत्रणा पुन्हा गती घेणार आहे.
कामगारांना २०१९ ते २४ पर्यंतची १२ टक्के वेतनश्रेणी व २०२४ ते २९ पर्यंत १० टक्के वेतनश्रेणीसह हलता महागाई भत्ता चार टप्प्यात लागू करण्याचे अथर्व प्रशासनाने मान्य केले. यावर्षीचा बोनसही देण्यास मान्यता दिली. हंगामी कामगारांचा प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले. कारखाना बंद राहिल्यास शेतकरी व अन्य घटकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न निकाली काढावा याबाबत आमदार रत्नाकर गुट्टे व मानसिंग खोराटे यांनी सूचना केली. त्यानुसार आज आमदार पाटील यांच्या कार्यालयात बैठक झाली. पगारासंदर्भातील मागण्या मान्य केल्या. कामगारांवर दाखल दावे मागे घेण्याबाबतही चर्चा झाली.
आमदार शिवाजी पाटील म्हणाले की, कारखानाही टिकला पाहिजे, हा हेतू ठेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनी यासाठी मोठी भूमिका बजावली. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला. कामगारांनी कामावर हजर होऊन शेतकरी व वाहतूकदारांना दिलासा द्यावा. यावेळी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण, पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, शांताराम पाटील, कामगार संघटनेचे महादेव फाटक, दीपक पाटील, बबन देसाई, नामदेव पाटील, सचिन बल्लाळ, रवींद्र बांदिवडेकर, अथर्वचे सीईओ विजय मराठे, अश्रू लाड, दयानंद देवाण, अशोक गडदे, देवराज पाटील यांच्यासह कामगार उपस्थित होते.











