पुणे : राज्यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर हा साखर पट्टा वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये किरकोळ अपवाद आंदोलनाचे वारे न घुमल्याने कारखानदारांचे गाळप सुरळीत सुरू आहे. पुणे जिल्ह्यात पहिल्या उचलीसाठी वारंवार आंदोलनांची परंपरा होती. मात्र अलिकडील काही वर्षात आंदोलने थांबली असल्याने गेल्या हंगामात जिल्ह्याने २६०० ते २८०० रुपये प्रतिटन एवढीच पहिली उचल घेतली होती. यावर्षी पुणे जिल्ह्यात साखर उताऱ्यानुसार २९५० ते ३२५० रुपये प्रतिटन अशी वेगवेगळी एफआरपी आहे. पण जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्याप एकरकमी एफआरपी देणार की पहिली उचल देणार हे जाहीर केलेले नाही.
राज्यात साखर हंगाम एक नोव्हेंबरला सुरू झाला आहे. पंधरा दिवसात उसाची एफआरपी द्यावी लागणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात गतवर्षाच्या साखर उतारा आणि तोडणी वाहतुकीनुसार ३२०० ते ३५०० रुपये प्रतिटन एफआरपी येत आहे. विविध शेतकरी संघटनांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कारखान्यांनी एकरकमी एफआरपीपेक्षाही जास्त रकमेची उचल जाहीर केली. भोगवती’ने सर्वाधिक ३६५३ रुपये, ‘दालमिया’ने ३६३४ रुपये, ‘जवाहर ने ३५१८ रुपये, ‘वारणा’ने ३५४४ रुपये, ‘कागल’ने ३५०० रुपये, ‘गोडसाखर’ने ३४०० प्रतिटन दर जाहीर केले आहेत. तर शेजारील कर्नाटक राज्यात सरकारच्या मध्यस्थीने उसाला प्रतिटन ३३०० रुपये दर ठरला. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मात्र कमालीची शांतता आहे. जिल्ह्यात कोंडी कोण फोडतो याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.












