सांगली : सांगली जिल्ह्यातील सोनहिरा, क्रांती, एन. डी. पाटील शुगर, दालमिया निनाईदेवी या साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला. पण राजारामबापू व हुतात्मा साखर कारखाना प्रशासनाने ऊस दर जाहीर केलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्याचा निषेध करत या दोन्ही कारखान्यांची उसाची वाहने रात्री पोलिस ठाण्यासमोर व बावची फाटा येथे अडवली. वाहने अडवल्यानंतर पोलिसांनी दोन्ही कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. स्वाभिमानी संघटनेने दोन तास आंदोलन केल्याने ही वाहने पेठ – सांगली महामार्गावर थांबून होती. यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक वैभव रकटे यांच्याशी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव व पदाधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर वाहने सोडण्यात आली.
संघटना शेतकऱ्यांसाठीच लढत आहे. दर जाहीर न केलेल्या साखर कारखान्यांना शेतकऱ्यांनीही ऊस पाठवू नये, सहकार्य करावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आष्टा पोलिस ठाण्यासमोर उसाने भरलेले पंधरा ते वीस ट्रॅक्टर अडवले. तेवढेच ट्रॅक्टर बावची फाटा येथेही अडविण्यात आले. वाहने अडवल्यानंतर आष्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी थांबून होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, शामराव जाधव, अरुण कवठेकर, प्रताप पाटील, जगन्नाथ भोसले, सचिन यादव, संपत पाटील, सुरेंद्र माळी, संपत भोसले, गणीभाई, संजय अनुसे आदी आंदोलनात सहभागी झाले.












