सांगली : श्री दत्त इंडिया कंपनी (वसंतदादा कारखाना) यंदा उसाला प्रतिटन ३ हजार ४०० रुपये दर देणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी आज दिली. त्यांनी सांगितले की, कंपनीचा नववा गळीत हंगाम २२ ऑक्टोबरला दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री महंत विद्वांस शामसुंदर शास्त्री महाराज, खासदार विशाल पाटील व कंपनीचे संचालक चेतन जयकुमार धारू यांच्याहस्ते झाला. ३ नोव्हेंबरला गळीत हंगाम सुरू करून आजअखेर कारखान्याचे गळीत ६८ हजार टन पूर्ण झाले.
श्री दत्त इंडियाचे तज्ज्ञ संचालक जितेंद्र धारु यांनी वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर घेतल्यापासून आजअखेर कार्यक्षेत्रामधील ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांचे हित जोपासण्यासाठी आठ वर्षांत प्रथम प्राधान्य दिले आहे. यंदा गळीतासाठी येणाऱ्या उसाला नियमाप्रमाणे ३ हजार २६३ रुपये एफआरपी होत आहे. एफआरपीपेक्षा १३७ रुपये जादा दर देणार आहे.
कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे म्हणाले, ‘कारखान्याकडे कोणतेही उपपदार्थ डिस्टिलरी, इथेनॉल, को-जनरेशन नाही. जिल्हा बँकेला भाडे प्रतिटन २६१ रुपये देऊन सांगली जिल्ह्यामधील कारखान्याच्या जवळपास ऊस दर देण्याचा प्रयत्न केला. कार्यक्षेत्रामधील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्व ऊस श्री दत्त इंडियाकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे.’ यावेळी सरव्यवस्थापक शरद मोरे, अमोल शिंदे, अधिकारी, कर्मचारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

















