कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत अथर्व कारखाना प्रशासन व कामगार यांच्यातील वाद बुधवारी मिटल्यानंतर आज नियमित शिफ्ट अनुसार कारखान्याच्या गाळ हंगामाला सुरुवात झाली. सुमारे पंधरा दिवसांनंतर सर्व कामगार आज प्रत्यक्ष कामावर हजर झाले. कामगार संघटनेने प्रशासनाकडे विविध अकरा मागण्या केल्या होत्या. सुरुवातीला प्रशासनाबरोबर बैठक झाली तिथे समाधानकारक तोडगा निघाल्याने हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहोचला. तिथे अथर्व प्रशासनाने अकरा पैकी नऊ मागण्या मान्य केल्या. मात्र त्रिपक्षीय करारानुसार पगार वाढ, महागाई भत्ता आणि हंगामी कामगारांना कायम करणे या मुद्द्यावरून पुन्हा मतभेद झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाची दखल घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याची अथर्व प्रशासनाला सूचना केली. त्यानुसार बुधवारी आमदार शिवाजी पाटील, अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे व कामगार संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्व मागण्या मान्य झाल्या. संघटनेनेही कामावर हजर राहण्याचे कबूल केले. त्यानुसार आज पहाटे चार ते दुपारी बाराच्या पहिल्या शिफ्टला संबंधित सर्व कामगार हजर झाले. त्यानंतर दुपारी बारा ते रात्री आठ व रात्रपाळीच्या शिफ्टला सुद्धा सर्व कामगार हजर राहिल्याचे अथर्व प्रशासनाकडून सांगण्यात आले. कारखाना सुरू झाल्यामुळे शेतकरी व वाहतूकदार यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.


















