अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल ११५० बिबटे असल्याचा वन विभागाचा अंदाज आहे. यापैकी कोपरगाव तालुक्यात पन्नास ते साठ बिबटे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गोदावरी, प्रवरा आणि मुळाच्या खोऱ्यातील उसाच्या पट्ट्यात ही संख्या हजारांहून अधिक असू शकते. दर अडीच वर्षांनी विषयाची नवी पिढी तयार होते. त्यामुळे आगामी काळात उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची परिस्थिती जुन्नरमध्ये सध्या आहे, त्यापेक्षा अधिक भयानक होऊ शकते. बिबटे जेरबंद करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात प्रशिक्षित पथक (टीम) तयार करणे, त्यांना पिंजरे आणि थर्मल ड्रोनसह अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
जिल्ह्यात अनेक बिबट्यांचा जन्म उसाच्या फडामध्ये झालेला आहे. उसाच्या फडात ते लहानचे मोठे झालेत. त्यांना वाहनांचे आवाज, प्रकाश, माणसांची लगबग आणि गोंगाट याची सवय झाली आहे. उसाचे फड तुटू लागले की ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून फडातील बिबटे सैरभैर होतात. माणसांवरील हल्ले याच काळात वाढतात. बिबट्यांची संख्या जशी वाढते तसे हे हल्ले देखील वाढत जातात. सध्या तशीच स्थिती असल्याने जिल्ह्याचा ग्रामीण भाग बिबट्याच्या दहशतीखाली आहे.
वन विभागाकडे कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि तोकडी साधन सामग्री असल्याने हा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. वन खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दिमतीला प्रशिक्षित रेस्क्यू टीम असतात. बऱ्याचदा अशा टीम हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि साखर कारखान्यांनी प्राणी मित्र स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आपापल्या कार्यक्षेत्रासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या रेस्क्यू टीम तयार कराव्यात, साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी. यात साई संस्थानचाही सहभाग घेता येईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.


















