सांगली : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी हंगाम सुरू करताना ऊस दर जाहीर केले आहेत. मात्र, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याने अद्याप दर घोषित केला नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांनी किल्ले मछिंद्रगड (ता. वाळवा) येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना अडवून रास्ता रोको आंदोलन छेडले. ‘दर जाहीर करा, अन्यथा ऊस थांबवा,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते (कृष्णा) साखर कारखान्याकडून ऊस दर जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
नरसिंहपूर येथील किल्ले मच्छिंद्रगड फाट्यावर स्वाभिमानीचे नेते भागवत जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील, अशोकराव सलगर, आकाश साळुंखे, प्रवीण फल्ले, मानसिंग पाटील, प्रदीप नांगरे, हणमंत पाटील, राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी कार्यकर्ते एकत्र आले. कारखान्याकडे निघालेले ट्रॅक्टर थांबवून ऊस वाहतूक रोखली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी १२ नोव्हेंबरपर्यंत कारखान्यांनी दर जाहीर करावा, अशी मुदत दिली होती. मात्र, काही कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी संघटनेचे भागवत जाधव म्हणाले की, इतर सर्व साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला आहे. मग, कृष्णा कारखाना का थांबला ? ऊस दर जाहीर झाला नाही, तर पुढचे आंदोलन तीव्र होईल. त्याची जबाबदारी व्यवस्थापनाची राहील.


















