कोल्हापूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’मध्ये मोडतोड करून पहिली उचल जाहीर केली. ‘स्वाभिमानी’ची ३५०० रुपयांच्या उचलीची मागणी मान्य करावी. हा तोडगा कारखान्यांना मान्य नसेल त्या कारखान्यांचे गाळप बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत कागल तालुक्यातील शाहू, हमिदवाडा व सर संताजी घोरपडे या कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जर साखर कारखान्यांनी पहिली उचल ३५०० रुपयांहून अधिक दिली नाही तर गाळप बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे दिला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हमिदवाडा कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, ‘शाहू’चे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण व संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांना निवेदन दिले. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष नामदेवराव भराडे, तानाजी मगदूम, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सरचिटणीस नीतेश कोगनोळे, उपाध्यक्ष पांडुरंग चौगुले, उत्तम भांबरे, पंढरीनाथ पाटील संभाजीराव यादव, शिवाजी कळमकर, उत्तम आवळेकर, शंकर पाटील, हिंदुराव अस्वले, पांडुरंग अडसूळ यांच्या सह्या आहेत.


















