पुणे : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. संचालक मंडळाने चालू हंगामामध्ये जास्तीत जास्त सभासदांचा ऊस गाळप करण्याचे नियोजन केले आहे. कार्यक्षेत्रातील सभासदांचा ताजा ऊस गाळपासाठी उपलब्ध होत असल्यामुळे साखरेचा उतार दररोज वाढत आहे. साखरेचा उतारा एक नोव्हेंबर रोजी ८.२६ टक्के होता. हा उतारा बुधवारी (ता. १२) १०.०२ टक्क्यांवर पोहोचला. साखर उतारा वाढल्यास उसाला दरही चांगला मिळणार आहे.
कारखान्याच्या साखरेच्या उताऱ्यामध्ये (रिकव्हरी) मध्ये पाच नोव्हेंबरपासून लक्षणीय वाढ होत आहे. त्याची सरासरी आता ८.९८ पर्यंत पोचली आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले की, कारखाना क्षमतेपेक्षा जास्त गाळप करीत आहे. कारखान्याच्या दोन्ही युनिटची क्षमता दररोज ६५०० टन आहे. गळीत हंगामातील उच्चांकी गाळप बुधवारी झाले. एका दिवसामध्ये ७,९०९ ऊस टन गाळप झाले असून कारखान्याने १२ दिवसांमध्ये ७२ हजारटन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. कारखाना लवकर प्रतिदिन आठ हजार टनापेक्षा जास्त क्षमतेने गाळप करणार असल्याचा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला. संचालक मंडळाने चालू गळीत हंगामामध्ये १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.


















