सातारा : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पाडेगाव (ता. फलटण-सातारा) येथील ऊस संशोधन केंद्राला नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या एकूण १४९२.५६ लाख रुपयांच्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या अंदाजपत्रकीय प्रस्तावास मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. पाडेगाव हे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे महत्त्वाचे संशोधन केंद्र असून, सदर केंद्राची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे. सन १९३२ मध्ये हे केंद्र मांजरी येथून पाडेगाव येथे स्थलांतरीत झाले. या ऊस संशोधन केंद्राने अधिक उत्पन्न देणाऱ्या ऊसाच्या अनेक सुधारित जाती प्रसारित केल्या आहेत.
या ऊस संशोधन केंद्राची प्रशासकीय इमारत ही ९३ वर्षे जुनी आहे. ती सन १९३२ मध्ये बांधण्यात आलेली होती. या इमारतीचा छताचा काही भाग कोसळलेला आहे. इमारत ही बरीच जुनी असल्याने नादुरूस्त अवस्थेत होती. त्यामुळे ऊस संशोधन केंद्रासाठी नवीन इमारतीचे बांधकाम करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन ही प्रक्रिया करण्यात आली. या केंद्राने आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ऊस लागवड तंत्रज्ञानासंबंधी अनेक महत्त्वाच्या शिफारशी आजवर दिल्या आहेत. या केंद्राने, राज्यातील ऊस लागवडीसाठी ऊसाच्या एकूण १७ जाती आजपर्यंत प्रसारित केल्या आहेत. उसाचे जास्त उत्पादन देणाऱ्या व साखरेचा उतारा देणाऱ्या ऊसाच्या जाती या केंद्रामार्फत प्रसारित झाल्या आहेत. ऊसाच्या वाणांची पैदास करणे, जैविक व अजैविक घटकांचा ताण सहन करणाऱ्या व कमी कालावधीत येणाऱ्या ऊसाच्या वाणांची निर्मिती करणे, ऊसाच्या शाश्वत उत्पादनासाठी ऊस उत्पादन तंत्रज्ञान विकसित करणे यात या केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

















