सांगली : “विश्वासराव नाईक साखर कारखान्यातर्फे २०२५-२६ हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला ३ हजार ५०० प्रतिटनप्रमाणे दर दिला जाईल,” अशी माहिती अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. अध्यक्ष नाईक म्हणाले, विश्वास’ने नेहमी सभासद, ऊस उत्पादकांचे हित जोपासले आहे. प्रतिवर्षी अधिकाधिक ऊसदर देण्याचा प्रयत्न केला आहे. साखर कारखानदारीबाबत केंद्र सरकारचे धोरण सकारात्मक नाही. उसाला दिला जाणारा प्रतिटन दर, तोडणी-वाहतूक, प्रक्रिया खर्च व बाजारात मिळणारी साखरेची किंमत याचा मेळ बसत नाही. ज्या पद्धतीने ऊस खरेदीचा दर वाढला गेला, त्या प्रमाणात साखरेची विक्री किंमत न वाढवल्यामुळे कारखान्यांना प्रसंगी तोटा सहन करावा लागत आहे. ‘विश्वास’ने गत वर्षी गाळपासाठी आलेल्या उसाला ३ हजार २७५ रुपये दर दिला आहे. हा दर एफआरपीहून १४१.६८ रुपये अधिक आहे.”
ते म्हणाले, “विश्वास’मध्ये होणाऱ्या उपपदार्थ निर्मितीमधून उसाच्या दराची सांगड घातली जात आहे. त्यातच पावसाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी ऊस उत्पादक व कारखानदारांना बसत आला आहे. यावर्षी तर ८ मेपासून पावसाने सुरुवात केली. तो ऑक्टोबरअखेर होता. उसाला थंडी पोषक असते, तिची सुरुवात आता झाली आहे. त्यात उसाची पळवापळवी वाढली आहे. संचालक मंडळाने सर्व गोष्टींचा सारासार विचार करून यावर्षी उसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी आपण पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे. नोंदीनुसार तोडणी-वाहतूक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. तोडलेला ऊस सत्वर गाळपास येईल, याची काळजी शेती विभाग घेत आहे.” यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, संचालक उपस्थित होते.


















