सोलापूर : माढा तालुक्यातील शेतकऱ्याने सलग पाचव्या वर्षी पिकवला एकरी १०० टन ऊस

सोलापूर : माढा तालुक्यातील बेंबळे येथील शेतीनिष्ठ ऊस भूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी सोमनाथ हुलगे यांनी ३० गुंठ्यांमधून तब्बल ८७ टन ऊस उत्पादन घेतले आहे. सरासरी एकरी ११६ टनांचा उच्चांकी उतारा त्यांनी मिळवला आहे. या आधी त्यांनी उसाचे सर्वाधिक एकरी १३६ ते १२५ टनाचे उत्पादन घेतले आहे. हुलगे यांनी पुन्हा विक्रमी उसाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. जमिनीची सुपीकता, योग्य खत व्यवस्थापन आणि ठिबकद्वारे अचूक पाणीपुरवठा केल्यास उसाचे शंभरी पार उत्पादन घेणे शक्य असल्याचे श्री. हुलगे यांनी सिद्ध केले आहे. हुलगे हे शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी ‘ऊस उद्दिष्ट शंभर प्लस’ या व्हॉट्सअॅप गटाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात.

हुलगे यांनी कोसी ८६०३२ या आडसाली जातीच्या उसाची लागण केली होती. हुलगे यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तागाच्या हिरवळीचे खत पिकवून जमिनीत गाडले. उभी-आडवी नांगरट करून मशागत केली. मे महिन्यात सरी पद्धतीने मिश्र खतांचा बेसल डोस देत मातीआड केली. त्यानंतर ठिबक संच बसवून पाच बाय दीडफूटावर बेणे लागवड केली. सध्या या उसाला ५१ ते ५५ कांड्या असून एका उसाचे वजन तीन ते चार किलोपर्यंत आहे. ऊस तोडणीवेळी कृषिरत्न डॉ. संजीव माने, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी नारायण लगड, तसेच महावीर मोरे, सचिन ढवळे, राजेंद्र कोळेकर, अमोल गळगुडे, गणेश हुलगे, नागनाथ भगत, रामराजे हुंबे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here