सातारा : ‘यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कारखानदार ऊसदराबाबत बोलायला तयार नाहीत. त्यासाठी आपणाला आंदोलन करावे लागेल. कष्टाचा दाम घ्यावाच लागेल. गप्प बसलो, तर कारखानदार केवळ ३,००० रुपयांच्या जवळपासचा ऊसदर देतील. आपण, न्याय्य आणि अधिकाधिक दरासाठी तयार असले पाहिजे. त्यासाठी रयत क्रांती संघटना पार्ले (ता. कराड) येथे ऊसदर परिषद घेणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बैठका सुरू आहेत’ अशी माहिती रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिली. कराड तालुक्यातील शामगाव येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
सचिन नलवडे म्हणाले की, चालू गळीत हंगामात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीरही केले आहेत. पण, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेले नाहीत. साखरेला चांगला दर मिळत असल्याने उसालाही चांगल्या दराची संधी आहे. तरीही साताऱ्यातील शेतकरी गप्प का असा प्रश्न उपस्थित होतो. कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिटन ३,६५० रुपयांच्या जवळपास ऊसदर जाहीर झालेत. तर, सांगली जिल्ह्यात ३,५०० रुपये ऊसदर जाहीर करण्यात आले आहेत. आपली मागणी ३,८०० रुपयांची असेल. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, सरपंच विजय पाटोळे, बापूराव पोळ, संतोष कणसे, एम. पी. पोळ, शिवाजी कुंभार, तात्यासाहेब पोळ, चंद्रकांत डांगे, संतोष पोळ, उमेश फाटक आदींसह शेतकरी उपस्थित होते.


















