अहिल्यानगर : जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, शेतकरी संघटना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात ३१ ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती. या बैठकीत शिवसेना (शिंदे गट) युवा नेते अभिजित पोटे यांनी उसाला केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे ३,५५० रुपये प्रति टन दर द्यावा, अशी मागणी केली होती. तसेच दर जाहीर न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, कारखान्यांनी दर जाहीर करण्यास चालढकल केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उसाला ३,५५० रुपये दर द्यावा, कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थ निर्मितीचा हिशोब द्यावा या मागण्यांसाठी शेतकरी व शिवसेना (शिंदे गट) युवा नेते अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.
साखर कारखान्यांकडून उसाच्या वजनात काटामारी सुरू आहे. एफआरपीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे न देणाऱ्या संबंधित साखर कारखान्यांवर साखर आयुक्त कार्यालयाकडून कारवाई होत नाही. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे बदल केल्याने तसेच क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्याने अपघात वाढत आहेत. प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिस विभाग अशा वाहनांवर कारवाई करण्यात अयशस्वी ठरत आहे. साखर कारखाने उपपदार्थ निर्मितीचा हिशोब देत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने गळीत हंगामाला प्रारंभ होताना कारखानदार, ऊस उत्पादक, शेतकरी संघटना आणि प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली जाते. या बैठकीला दुय्यम दर्जाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैठकीला पाठवितात, असा आक्षेपही शेतकरी संघटनांनी घेतला आहे.


















