कोल्हापूर : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) चे महासंचालक डॉ. संभाजीराव कडू-पाटील यांच्यासह वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कपिल सुशिर, चिप अकाउंटंट शिवाजी खेंगरे यांनी शिरोळ येथील दत्त साखर कारखाना कार्यस्थळी भेट दिली. तसेच घालवाड, शिरोळ येथे झालेल्या जमीन क्षारपडमुक्तीच्या कामाची पाहणी केली. सच्छिद्र निचरा प्रणाली वापरल्यानंतर तोडणीस आलेल्या उसाची पाहणी करून त्यांनी क्षारपडमुक्तीच्या कामाचे कौतुकही केले.
कारखान्याचे मार्गदर्शक, संचालक गणपतराव पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांनी २३ गावांत १० हजार एकरावर २१० किलोमीटर मुख्य पाईपलाईनसह ४५०० एकरावर अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. अभियंता कीर्तिवर्धन मरजे, सुदर्शन तकडे यांनी आराखड्यासह सर्व तांत्रिक माहिती सांगितली.
यावेळी क्षारपडमुक्तीच्या कामांमध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी अनुभव कथन केले. अस्मिता सतीश पाटील यांच्या कोंडिग्रे येथील ०२६५, तसेच को-८६०३२ या प्रत्येकी पाच एकर क्षेत्राच्या १५० टन स्पर्धा प्लॉटला आणि तीन एकरमधील टिश्यू कल्चर ऊस बियाणे प्लॉटलाही त्यांनी भेट दिली. १३००७ या ऊस जातीचे सुपर केन नर्सरीचे आधुनिक तंत्रज्ञान पाहून ते भारावून गेले. आंबा आणि हळद पिकविलेल्या ठिकाणाला त्यांनी भेट दिली


















