कोल्हापूर : वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी शहारातील वर्दळीच्या मार्गावरील ऊस वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवली आहे. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याने अपघातांचा धोका कायम आहे. बेफिकीर ऊस वाहतूकदारांना घालण्यासाठी, तसेच ताराराणी चौक ते सीपीआर चौक आणि भाऊसिंगजी रोडवरील ऊस वाहतूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून सुरू आहे. संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानने शहरातून होणाऱ्या धोकादायक ऊस वाहतुकीबद्दल पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
गळीत हंगाम सुरू होताच शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दोन नोव्हेंबरला ऊस वाहतुकीबद्दल नियमावली प्रसिद्ध केली. शहरात ताराराणी चौक ते सीपीआर चौक आणि सीपीआर चौक ते भाऊसिंगजी रोड, चप्पल लाइन ते रंकाळा स्टैंड, सुभाष रोड अशा प्रमुख वर्दळीच्या मार्गावरील ऊस वाहतुकीला प्रवेश बंदी केली. तातडीने तीन नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. प्रवेश बंदी असतानाही कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर चौकातून अजूनही उसाची वाहने जातात.
…हे आहेत कमी वर्दळीचे पर्यायी मार्ग
प्रमुख मार्गावरील ऊस वाहतूक बंद करताना पोलिसांनी ऊस वाहतूकदारांना कमी वर्दळीचे पर्यायी मार्ग सुचवले आहेत. ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद हॉल चौक, पितळी गणपती मंदिर, रमणमळा पोस्ट ऑफिस, खानविलकर पेट्रोलपंप, सीपीआर चौक ते जुना बुधवार पेठमार्गे शिवाजी पुलावरून पुढे मार्गस्थ होण्याचा पर्याय दिला आहे. शहरातील सुभाष रोड, भाऊसिंगजी रोडला रिंगरोडचे पर्याय दिले आहेत.


















