सोलापूर : महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या (सन २०२५-२६) गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३००० रुपये एफआरपी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबतचे परिपत्रक कारखान्याने प्रसिद्धीला दिले आहे. कर्नाटकमधील इंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंतराय गौडा पाटील हे भीमाशंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन आहेत. कर्नाटकातील अनेक कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला, मात्र भीमाशंकर कारखान्याने निर्णय जाहीर केला नव्हता. कारखान्याने प्रतिटन ३००० रु. दर देण्यात येत असल्याचे परिपत्रक कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काढले आहे.
कर्नाटक सरकारने राज्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. भीमाशंकर कारखान्याची एफआरपी ३२९१ रुपये निश्चित करण्यात आली असून राज्य सरकार प्रतिटन ५० रु. अधिक ५० रु. कारखान्याकडून ऊस तोडणी वाहतूकसह ३३९१ रुपये द्यावे लागणार आहेत. कारखान्याने प्रतिटन २९०० रु., दुसरा हप्ता म्हणून कारखान्याकडून ५० रु. तर राज्य सरकारचे ५० रु. प्रतिटन याप्रमाणे ३००० रु. दर दिला जाणार आहे.
महाराष्ट्रातील उत्पादकांचे काय ?
कर्नाटक हद्दीतील साखर कारखान्यांना महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केला जातो. कधी कर्नाटकातील शेतकरी महाराष्ट्रातील कारखान्यांना ऊस पुरवठा करतात. शेतकरी सारा एक या भूमिकेतून आतापर्यंत ऊस दराबाबत दुजाभाव केला जात नसे. काही वर्षांपूर्वी कर्नाटकात अतिरिक्त ऊस झाल्याने शेतकऱ्यांनी ‘लोकमंगल’ला पाठवला. यावेळी त्यांना कमी दर देण्याचे घाटत असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी समान दर देण्यास भाग पाडले होते. या पार्श्वभूमीवर आता कर्नाटकचे कारखाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणता दर देणार? याविषयीची उत्सुकता आहे.


















