अहिल्यानगर : शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते अभिजित पोटे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन सुरू केले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उसाला ३,५५० रुपये प्रतिटन हमीभाव कारखान्यांनी जाहीर करावा, साखरेचा उतारा योग्य पद्धतीने दाखवावा, वजन काटे व सॉफ्टवेअरमधील फेरफार थांबवावी आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. जिल्ह्यात खासगी व सहकारी साखर कारखाने हे बहुतांश विविध राजकीय पक्षांशी संलग्न आहेत. या सर्वांनी संघटितपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. कुकडी कारखान्याने शेतकऱ्यांचे ७११ रुपये प्रतिटन थकीत रक्कम तत्काळ जमा करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
याबाबत अभिजित पोटे म्हणाले की, कुकडी साखर कारखान्याकडील ७११ रुपये प्रतिटन थकबाकी तत्काळ देण्यात यावी. यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या मुक्काम आंदोलनात सहभागी व्हावे. तसेच साखर कारखान्यांकडून जाणीवपूर्वक साखर उतारा कमी दाखवून एफआरपी कमी केली जाते. कारखान्यांनी ७५० रुपयांपेक्षा जास्त तोडणी- वाहतूक खर्च आकारू नये, कारखान्याच्या २५ किलोमीटर क्षेत्र सीमेच्या बाहेरून उसाची वाहतूक करून इतर शेतकऱ्यांवर अनावश्यक भार टाकू नये, वजन काट्यावर फेरफार करणाऱ्या व ऑडिटमध्ये अनियमितता करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, आदी मागण्या आम्ही केल्या आहेत. महादेव आव्हाड, संजय वाघ, सोमनाथ गर्जे, युसूफ पठाण, बाळासाहेब कदम, कृष्णा सातपुते, सोपान चावरे, सचिन लांबे, संदीप धाडगे, अशोक हसुळे, सुनील कर्डिले, गणेश शेलार, अमोल तांबे, राहुल फुंदे, गणेश सातपुते आदींसह शेतकरी सहभागी झाले आहेत.


















