पुणे : श्री छत्रपती कारखान्याच्या गळीत हंगामास एक नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. कारखान्याने सोळाव्या दिवशी, रविवारी एक लाख टन ऊस गाळपाचा टप्पा गाठला. आतापर्यंत १,०४,८९१ टन ऊस गाळप पूर्ण झाले असून ८८,९०० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. रविवारी साखरेचा उतारा (रिकव्हरी) १०.१६ टक्क्यावर पोहोचला. तर सरासरी उतारा ९.३४ झाला आहे. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आजअखेर २७ लाख ९ हजार युनिट विजेची महावितरणला निर्यात केली आहे. गळीत हंगामापूर्वी कारखान्याच्या ओव्हर ऑइलिंग व दुरुस्तीचे कामे चांगल्या दर्जाची झाल्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक गाळप करीत आहे.
याबाबत कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले की, कारखान्याचे सभासद, कामगारांनी संचालक मंडळावर विश्वास ठेवला आहे. शेतकरी विश्वासाने कारखान्याने ऊस देत आहेत. सर्वांच्या विश्वासामुळे एक लाख टन ऊस गाळपाचा टप्पा यशस्वी पूर्ण झाला असून सर्वांनी एकजुटीने काम करून १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून कारखान्याला अडचणींमधून बाहेर काढू. कारखान्याच्या दोन्ही युनिटची गाळप क्षमता ६५०० टन आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कारखाना ८ हजार टनापेक्षा अधिक गाळप करीत आहे. रविवारी एका दिवसामध्ये ८२०४ टन उसाचे गाळप झाले. कारखान्याने खोडवा उसाला १०० रुपये प्रतिटन व पूर्व हंगामी, सुरू उसास ७५ रुपये प्रतिटन अनुदान जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप उशिरा झाल्यास तोटा होणार नाही.


















