सोलापूर : जिल्ह्यातील २५ कारखान्यांचा गाळप परवाना मंजूर झाला असून ९ कारखान्यांचा गाळप परवाना मंजूर होण्याच्या प्रक्रियेत आहे. जिल्ह्यातील ४० साखर कारखांन्यापैकी ३४ कारखान्यांनी गाळप परवाना मागितला होता. तर उर्वरित सहा साखर कारखान्यांनी अद्यापही परवाना मागितलेला नाही. कारखानेही सुरू केलेले नाहीत. यामध्ये मकाई, संतनाथ, स्वामी समर्थ, संत शिरोमणी, मातोश्री आणि इंद्रेश्वर साखर कारखान्यांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या बहुतांश कारखान्यांची तोडणी यंत्रणा जोमात सुरू असून गाळप सुरू आहे. गाळपाला गतीने सुरुवात झाली आहे. गेल्या १८ दिवसांत १६ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यातून ११ लाख ११ हजार १३० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. मात्र, अद्याप अपवाद वगळता कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ असून संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की, सध्या प्रत्येक कारखान्याच्या प्रशासनाला भेटून दर जाहीर करण्याबाबत निवेदन देत आहोत. मात्र तरीही कारखान्यांनी सकारात्मक भूमिका घेतली नाही तर येत्या २० तारखेपासून जिल्ह्यात उग्र आंदोलन सुरू करणार आहोत. सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये ऊस दरावरून शेतकरी आक्रमक झाले. यामुळे बहुतांश कारखान्यांनी दर जाहीर केला आहे. मात्र जिल्ह्यात ऊस दराची कोंडी अद्याप कायम आहे. दरम्यान, कारखानदारांनी ऊस दर तत्काळ जाहीर करावा यासाठी ऊस दर सुधार समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत शेतकरी संघटना यासारख्या संघटनांच्या वतीने प्रशासनाला निवेदन दिले. मात्र याला कारखानदार जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे.


















