पुणे : राज्यात गाळप हंगामाने गती घेतली आहे. आपला ऊस लवकर तोडून नेण्यासाठी शेतकऱ्यांची घाई सुरू आहे. अशातच काही शेतकऱ्यांना मुकादमाला अक्षरशः विनवण्या करण्याची वेळ येते. नेमके याचवेळी शेतकऱ्यांना विविध कारणांनी अडवणुकीला सामोरे जावे लागते. अनेकदा ऊस तोडणी संबंधित यंत्रणेकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जातो. या पार्श्वभूमीवर ऊस तोडणीविषयक उद्भवणाऱ्या तक्रारींबाबत ‘तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय साखर आयुक्तालयाकडून घेण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्याने आलेल्या तक्रारींची चौकशी सात दिवसांमध्ये करावी. सर्व शेतकऱ्यांना याची माहिती होण्यासाठी कारखान्यांच्या आणि ग्रामपंचायतींच्या फलकावर संबंधित अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
याबाबत राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितल की, आयुक्तालयाकडे शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या तक्रारी येतात. त्यासाठी उपाययोजना म्हणून आम्ही तक्रार निवारण अधिकारी’ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीची सात दिवसांमध्ये चौकशी करणे बंधनकारक असेल. त्यानंतर पुढील कार्यवाहीची अंमलबजावणी होईल. ऊस तोडणीविषयक तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यावर लेखी स्वरूपात तत्काळ साखर कारखान्याकडे तक्रार करावी. या अर्जाची शेतकऱ्यांनी पोच घेणे गरजेचे आहे. तक्रारीचे निवारण कारखान्याकडून झाले नाही, तर शेतकऱ्यांना संबंधित प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे ई-मेलद्वारेही तक्रार नोंदविता येणार आहे. सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे महाव्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करावेत. चौकशीत सत्यता आढळून आल्यास संबंधित मुकादमाच्या बिलातून रक्कम वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात यावी, असेही बजावण्यात आले आहे.

















