अहिल्यानगर : साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन ३,५५० रुपये दर जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्या उपस्थितीत बैठक झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगरे व इतर कार्यकर्ते, प्रादेशिक साखर सहसंचालक व कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीतही तोडगा निघाला नाही.
ऊस दराच्या प्रश्नावर शिवसेना (शिंदे गट) युवा नेते अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आयोजित या बैठकीला बऱ्याच शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावले नाही. नेहमीप्रमाणे माध्यमांचे प्रतिनिधी बैठकीपासून दूर होते. या संदर्भात शेतकरी संघटना आक्रमक असताना प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. साखर कारखानदारांनी साखरेचा उतारा योग्य पद्धतीने दाखवावा, वजनकाटे व सॉफ्टवेअरमधील फेरफार थांबवावी, कुकडी साखर कारखान्याकडील थकीत रक्कम तात्काळ द्यावी, आदी मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र, उसाला वाढीव दर देण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, त्यामुळे साखर आयुक्त कार्यालयात बैठक घेणार असल्याचे यावेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वासन देण्यात आले.


















