पुणे : राज्यात यंदा २०२५-२६ या हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील सहकारी व खासगी अशा एकूण २१४ साखर कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी १८ नोव्हेंबरअखेर १९२ साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला असून २२ कारखाने अद्याप गाळप परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रादेशिक साखर सहसंचालकांकडून आयुक्तालय स्तरावर प्राप्त अर्जांची छाननी झाली. त्यातून नियमांचे पालन करणाऱ्या साखर कारखान्याना गाळप परवाने वितरित करण्यात आल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले. अन्य कारखान्यांच्या अर्जांचीही छाननी सुरु असून साखर आयुक्तालयाने तयार केलेल्या नियमावलीच्या अधीन राहून गाळप परवाना दिला जाणार असल्याचे साखर आयुक्तालयात सहसंचालक (विकास) महेश झेंडे यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, राज्यात गाळप हंगामाने गती पकडली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अद्याप शेतकरी संघटना उस दरावरून आक्रमक आहेत.कर्नाटकच्या तुलने महाराष्ट्रात जादा ऊस दर असल्याने कर्नाटक सीमाभागातील शेतकरी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ऊस पाठ्विण्य्साठी उत्सुक आहेत. त्यामुळे कर्नाटकातील साखर कारखानदार धास्तावले आहेत.


















