सांगली : श्रीपती शुगर कारखान्याने केले एक लाख टन ऊस गाळप, पथकाच्या तपासणीत सर्व काटे ठरले अचूक

सांगली : राज्याचे माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांची दुष्काळी पट्ट्यात कारखाना उभा रहावा ही संकल्पना होती. त्यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी दुष्काळी जत तालुक्यातील डफळापूर येथे श्रीपती साखर कारखाना सुरू केला. डफळापूरचा श्रीपती साखर कारखाना उत्पादनाचा नवा इतिहास घडवित आहे. माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत एक लाख मॅट्रिक टन गाळप केले असून नुकतेच भरारी पथकाने कारखान्याच्या सर्व ऊस वजन काट्यांची तपासणी केली असता सर्व वजन काटे अचूक असल्याचा लेखी अहवाल भरारी पथकाने दिल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर महेश जोशी यांनी दिली.

महेश जोशी म्हणाले, श्रीपती शुगरची स्थापना जत तालुक्यातील डफळापूर- कुडनुर येथे १ ऑगस्ट २०२० रोजी केली. या कारखान्याची प्रति दिन गाळप क्षमता २५०० मे. टन इतकी आहे. सद्यस्थितीत जत व कवठेमहांकाळ तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड आहे. या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांना वेळेत ऊस गाळप करण्याची सतत चिंता सतावत होती, ती चिंता श्रीपती कारखान्यामुळे मिटली आहे. अचूक वजनकाटे व शेतकऱ्यांना दराचा दिलेला शब्द पाळणारा कारखाना म्हणून श्रीपती शुगर कारखाना ओळखला जातो. श्रीपती शुगरने या गाळप हंगामात पाच लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी, २५० ट्रॅक्टर, १५० अंगत व १० हार्वेस्टर मशीनचे करार केले आहेत. येणाऱ्या काळात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून यंदाचे गाळप उद्दिष्ट पूर्ण केले जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

शासनाच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या भरारी पथकाने कारखान्याच्या सर्व ऊस वजन काट्यांची तपासणी केली असता सर्व वजन काटे अचूक असल्याचा लेखी अहवाल भरारी पथकाने दिला. भरारी पथकात पथक प्रमुख म्हणून जतचे तहसिलदार प्रवीण धानोरकर, पुरवठा निरीक्षक एस. सी. चोथे, मारुती नरळे, उदय कोळी, एम. डी. वझे, डी. बी. माळी सहभागी होते. पथकाने वजन होऊन गेलेली वाहने गव्हाणीवरुन परत घेऊन वजन तपासले असता त्यामध्ये तफावत आढळून आली नाही. यावेळी कारखान्याचे चिफ इंजिनिअर यशवंत जाधव, शेती अधिकारी सतीश मिरजकर, आनंदा कदम, प्रवीण कौलापूर, माणिक पाटील, नासीर मलाबादे, अधिकारी, ऊस वाहतूकदार व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here