चंद्रपूर (महाराष्ट्र) : ब्रम्हपुरीजवळील बोरगाव गावाच्या रस्त्यावर असलेल्या रामदेव बाबा सॉल्व्हंट्स फॅक्टरीच्या समोरील इथेनॉल प्रकल्पात बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणांतच प्रचंड स्फोट झाला आणि त्याचा धक्का तब्बल दोन किलोमीटरपर्यंत जाणवल्याने मोठा हादरा बसला. कंपनीच्या परिसरात १.२५ लाख लिटर इथेनॉलचा साठा असल्याचे समोर आले आहे. नुकताच हा प्रकल्प सुरू झाला आहे. आगीनंतरच्या स्फोटाचा प्रभाव बोरगाव, उदापुर, झिलबोडी, फुलेनगर, पेठ वार्ड, धुमणखेडा, शिवाजी चौक आणि ब्रह्मपुरी शहरातील विविध भागांमध्ये जाणवला.
आगीची माहिती समजताच ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल तसेच गडचिरोली आणि वडसा येथील फायर ब्रिगेड पथके तातडीने पोहोचली. आग मोठ्या प्रमाणात असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेकडून फोम सोल्यूशनसह दोन फायर टेंडरही रवाना करण्यात आली आहेत. पोलिस दल व डॉक्टरांची टीमही घटनास्थळी तातडीने दाखल झाली. घटनास्थळी प्रचंड धुराचे लोट उठत असून सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. स्फोटाचा आवाज आणि हाजरे दोन किलोमीटरपर्यंत जाणवल्याने परिसरात घबराट पसरली. या आगीमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. जिल्हा प्रशासनाने याची चौकशी सुरू केली आहे.

















