कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लाल, काळ्या जमिनीमध्ये असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या उसामुळे गुळाला मोठी मागणी आहे. गुळाच्या या गोडव्यामुळे संपूर्ण देशभरात कोल्हापुरी गुळाची एक हक्काची बाजारपेठ तयार झाली होती. मात्र, केवळ शासकीय उदासीनतेमुळे कोल्हापूरची गुऱ्हाळघरे नामशेष होऊ लागली आहेत. जिल्ह्यातील हजारहून अधिक गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत. जिल्ह्यात नोंदणीकृत १२५० गुऱ्हाळघरे असली तरी त्यापैकी फक्त १८० गुऱ्हाळघरे सुरु आहेत. कोल्हापुरी गुळाच्या नावावर इतर जिल्ह्यांतील गुळाची सर्रास विक्री होते. यावर मात करण्यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने भौगोलिक स्थान निश्चिती (जीआय) मिळवली. पण त्यापुढील कोणतीही कार्यवाही बाजार समितीने केलेली नाही. त्यामुळे कर्नाटकसह सीमाभागातून बाजारात येणारा गूळ कोल्हापूरचाच म्हणून विकला जातो.
जिल्ह्यात एकेकाळी तब्बल १२०० हून अधिक गुऱ्हाळघरांतून दर्जेदार गुळाची निर्मिती होत होती; परंतु पायाभूत सुविधांचा अभाव, दराची अनिश्चितता, शासकीय धोरणांची वानवा, हमीभाव आणि आधारभूत किंमत नसल्याने व गुळाला तारण योजनेतून वगळल्याने गूळ निर्मिती उद्योग अडचणीत सापडला आहे. कोल्हापुरीच्या नावावर इतर गुळांची होणारी विक्री हे एक आव्हान आहे. याचबरोबर रॉ शुगर्स निर्मितीतून गूळ पावडरची सुरू असलेली विक्रीही गूळ उद्योगासमोर नवे आव्हान आहे. गुळाच्या पावडरमधील मुख्य घटकांचा अभाव असताना अशा बनावट पावडरचा चॉकलेट, आईस्क्रीम, बिस्कीट आदी उपपदार्थांमध्ये वापर करून फसवणूक सुरू आहे. याबाबत, भुये (ता. करवीर) येथील शेतकरी अभिजित पाटील म्हणाले की, गुऱ्हाळघरांवर गूळ तयार करण्यात गुळव्यांची भूमिका महत्त्वाची असते. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय गुळवे केवळ अनुभवाच्या जोरावर गूळ तयार करण्यात तरबेज झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरवस्तीत राहणारे रहिवासी अनेक वर्षांपासून गुळवे म्हणून काम करत आहेत; पण वाढते वयोमान आणि नवीन पिढीने या व्यवसायाकडे केलेले दुर्लक्ष यामुळे गुळव्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

















