कोल्हापूर : ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातील वाहनमालकांनी टोळ्यांशी करार केले. मात्र, अनेक टोळ्यांचे मुकादम व ऊस तोडणी मजूर गायब आहेत. त्यामुळे वाहनधारक लाखो रुपयांचा अॅडव्हान्स बुडाल्याने हवालदिल झाले आहेत. अनेक वाहन मालकांनी प्रसंगी घरातील सोन्याचे जिन्नस गहान ठेवून टोळ्यांना अॅडव्हान्स दिला आहे. गेली कित्येक वर्षे विश्वासावर हा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे ऊस वाहतूकदार लाखो रुपयांची गुंतवणूक ही विश्वासावर करीत असतो; परंतु ऊसतोडणी टोळ्यांकडून विश्वासघात होत आहे. परिणामी, याचा आर्थिक फटका वाहनधारकांना बसत आहे.
याबाबत ट्रक वाहतुकदार मारुती पाटील यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले की, यावर्षी बीड भागातील दोन टोळ्यांना बारा लाखांची अॅडव्हान्स पावसाळ्यात दिली होती. ऊसतोडीसाठी मजूर आणण्यास बीड भागात गेलो असता, त्या गावामध्ये मुकादमच पसार झाला होता. फोन बंद होता. पंधरा दिवसांनंतर हतबल होऊन रिकामे वाहन घेऊन घरी येण्याची वेळ आली. कारखान्याची अॅडव्हान्स कशी भागवायची ? या विवंचनेत आहे. ऊसतोडीसाठी प्रत्येक वर्षी बीड, परभणी, नांदेड, जिंतूर, विजापूर, मध्य प्रदेश येथील बहुसंख्य मुकादम अॅडव्हान्सपोटी पावसाळ्यामध्ये रक्कम घेतात. वाहतूकदारांनी टोळ्यांना लाखोच्या घरात, प्रसंगी कर्ज काढूनही रक्कम दिलेली असते. हंगाम चालू होऊनही काही टोळ्या दाखल झालेल्या नाहीत. टोळी मुकादमांनी फसवणूक केल्याने लाखो रुपयांची फसवणूक होत आहे.


















