पुणे : राज्यात ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून साखर आयुक्तालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 19 नोव्हेंबरअखेर 117.27 लाख टन उसाचे गाळप झाले असून 86.81 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 7.4 टक्के आहे. 29.61 लाख टन उसाचे गाळप करून कोल्हापूर विभागाने 25.32 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा 8.55 टक्के इतका आहे. विभागात 20 सहकारी आणि 10 खासगी असे 30 कारखाने सुरु आहेत. ऊस गाळप आणि साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे.
राज्यात 19 नोव्हेंबरअखेर 77 सहकारी आणि 70 खाजगी अशा 147 कारखान्यांनी हंगाम सुरु केला आहे. मागील हंगामात याच कालावधीत 33 सहकारी आणि 58 खाजगी अशा एकूण 91 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला होता. मागील वर्षी याच काळात 13.5 लाख टन उसाचे गाळप होऊन 5.67 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणत गाळप झाले आहे.
पुणे विभागाचा साखर उतारा 7.96 टक्के…
पुणे विभागात 15 सहकारी आणि 8 खाजगी असे एकूण 23 कारखाने सुरु आहेत. त्यांनी आतापर्यंत 27.57 लाख टन उसाचे गाळप करून 21.94 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा उतारा 7.96 टक्के आहे. सोलापूर विभाग ऊस गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 12 सहकारी आणि 20 खाजगी असे एकूण 32 कारखाने सुरु आहेत. आतापर्यंत विभागात 27.38 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 18.51 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा 6.76 टक्के इतका आहे.
अहिल्यानगर विभाग ऊस गाळपात चौथ्या क्रमांकावर…
अहमदनगर (अहिल्यानगर) विभाग ऊस गाळपात चौथ्या क्रमांकावर आहे. या विभागात 12 सहकारी आणि 9 खाजगी असे एकूण 21 कारखाने सुरु झाले आहेत. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 14.71 लाख टन उसाचे गाळप करून 9.75 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.अहमदनगर विभागाचा साखर उतारा 6.63 टक्के आहे.
छत्रपती संभाजीनगर, नांदेड विभाग अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर…
छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड विभाग अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात 9 सहकारी आणि 6 खाजगी अशा एकूण 15 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यांनी 9.75 लाख टन उसाचे गाळप करून 6 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर उतारा 6.15 टक्के इतका आहे.
नांदेड विभागात 9 सहकारी आणि 15 खाजगी असे एकूण 24 कारखाने सुरु असून त्यांनी 7.3 लाख टन उसाचे गाळप करून 4.56 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 6.25 टक्के इतका आहे. अमरावती विभागात 2 खाजगी कारखाने सुरु असून 0.95 लाख टन उसाचे गाळप करून 0.73 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 7.68 टक्के आहे. नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरु झालेला नाही.


















