कोल्हापूर : केनवडे (ता. कागल येथील) श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्सने २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी उसाला विनाकपात एकरकमी प्रतिटन ३४२६ रुपये ऊसदर देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी दिली. घाटगे म्हणाले, यंदा कारखान्याचा पाचवा गळीत हंगाम असून, या वर्षी अडीच लाख मेट्रिक टन गाळप करण्याचा मानस आहे. कारखाना अडचणीत असूनही कोणाशी स्पर्धा न करता इतर कारखान्यांच्या बरोबरीत ऊसदर देण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे.
संजयबाबा घाटगे यांनी सांगितले कि, कर्जाचा बोजा अधिक असल्यामुळे दराबाबत खूप बंधने येतात. कारखाना कर्जमुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमच्यावर विश्वास ठेवून यंदाही ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट अंबरिशसिंह घाटगे यांनी केले. यावेळी संचालक दौलू पाटील, दत्तोपंत वालावलकर, एम. बी. पाटील, आनंदा साठे, के. के. पाटील, मल्हारी पाटील, तानाजी पाटील, सुभाष करंजे, राजू भराडे आदी उपस्थित होते.


















