बेळगाव : जिल्ह्यात ऊस गळीत हंगामाला प्रारंभ झाल्यापासून वाहनांचे अपघात वाढल्याचे दिसून येत आहे. हे अपघात वाढण्याची कारणे शोधली असता बहुतांश अपघात हे बेशिस्तपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी जिल्ह्यातील ३४ पोलिस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिल्यापासून कारवाईला जोर आला आहे. त्या – त्या पोलिस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत कारवाई सुरू केली. कारवाईच्या सलग तिसऱ्या दिवशी पोलिसांनी कर्णकर्कश साऊंड सिस्टिम व एलईडी लावलेले दहा ट्रॅक्टर जप्त केले. २२३ वाहनांना रिफ्लेक्टर लावले असून ३९ ट्रॅक्टरचालकांना समज देत जागृती केली.
ऊस वाहतूक करणारे वाहतुकदार मुख्य रस्त्यावर कशाही पद्धतीने ट्रॅक्टर चालवतात. वाहन चालवताना मोठ्या आवाजात गाणी वाजवत जाणे, पाठीमागील वाहनाला पुढे जाऊ न देणे, रात्रीच्यावेळी एलईडी लाईट लावून वाहने चालवणे असे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहेत. रात्रीच्यावेळी अन्य वाहनचालकांना या ऊसवाहू ट्रॅक्टरचा प्रचंड त्रास जाणवत आहे. त्यामुळे सुरू केलेल्या कारवाईत मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिम लावलेले दहा ऊसवाहू ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केलेत. दोडवाड, घटप्रभा, चिकोडी, रायबाग व कुडची पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही कारवाई झाली. शिवाय मुरगोड, गोकाक व यमकनमर्डी येथे एलईडी लावलेले तीन ट्रॅक्टर जप्त केले. पोलिस खात्याकडून जनजागृतीदेखील सुरू करण्यात आली आहे. एकूण २२३ ट्रॅक्टरना रिफ्लेक्टर देखील लावण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळी घटप्रभा येथे दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला ट्रॅक्टर ट्रॉलीने ठोकरल्याने या महिलेचा बळी गेला.


















