सोलापूर : गेल्या वर्षीच्या गाळप हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. उसाच्या कमतरतेमुळे तसे साखर कारखाने फारच कमी दिवस चालले होते. संपूर्ण ऊस गाळप झाले. यापैकी, १६२ साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक पैसे ऊस उत्पादकांना दिले आहेत. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यांतील ३८ साखर कारखान्यांनी १४० कोटी रुपयांची एफआरपी थकवली आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी गाळप घेतलेल्या २०० कारखान्यांनी एकूण ८५५. १० लाख मे. टन उसाचे गाळप केले. त्यासाठी एफआरपीची ३१,५९८ कोटी रुपये देय रक्कम होती. कारखान्यांनी ३१, ४५८ कोटी रुपयांची एफआरपी अदा केली आहे. तर १४० कोटी रुपये देणे शिल्लक आहे. एफआरपी न दिलेल्या २८ कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या वीस दिवसांपासून गळीत हंगामाला वेग आला आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार सध्या १४७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. आतापर्यंत ११७ लाख मे. टन ऊस गाळप झाले असून त्यापासून ८७ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. यंदा दोनशेपेक्षा अधिक साखर कारखाने सुरू होतील, असा अंदाज होता. मात्र, मागील वर्षांची थकलेली एफआरपी, अपुरी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा व अर्थकारणामुळे साखर कारखाने सुरू होण्यास उशिर होत आहे.


















