अहिल्यानगर : यंदाच्या हंगामात ऊसतोडणीसाठी आलेल्या सर्व कामगारांची शिंगणापूर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना गोळ्या, औषधांचे वाटप करण्यात आले. महिला कामगारांना मोफत सॅनिटरी पॅडचेही वाटप करण्यात आले. उपमुख्य शेती अधिकारी सी. एन. वल्टे यांनी स्वागत केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज बत्रा यांनी ऊसतोडणी कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेवुन नियमीत शारीरीक स्वच्छता ठेवावी, असे आवाहन केले. लहान मुलांमधील अॅनिमिया, जंत आदींबाबत घ्यायची काळजी, रक्तवाढीसाठी उपाययोजना, गर्भवती ऊसतोड महिलांची नियमीत आरोग्य तपासणी याविषयी मार्गदर्शन केले.
मुख्य शेतकी अधिकारी एन. डी. चौधरी यांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी ऊसतोडणी कामगारांसाठी आवश्यक भौतिक सोयी सुविधा कारखान्याच्या कार्यस्थळावर उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. कामगारांना पिण्याचे पाणी, वापरावयाचे पाणी, ऊस तोडणी कामगाराकडील पशुधनाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून लम्पीसदृष्य लसीकरण केले जात आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे आदी उपस्थित होते. नानासाहेब होन यांनी आभार मानले.


















