धाराशिव : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाला आता वेग आला आहे. मागील गळीत हंगामात जिल्ह्यात एकूण १२ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. तर जिल्ह्यातील १४ साखर कारखाने सुरू आहेत. जिल्ह्याची दैनंदिन एकूण ऊस गाळप क्षमता ५२ हजार ७५० टन आहे. या १४ कारखान्यांनी बुधवारअखेर ५,५६,७९० टन उसाचे गाळप केले. त्यातून २,७५,५४० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. यात साखरेचा सरासरी उतारा केवळ ४.९५ टक्के आला आहे. यंदा गळीत हंगाम अधिक काळ चालण्याची शक्यता आहे. सहा सहकारी आणि आठ खासगी कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे.
गेल्यावर्षी कारखान्यांना उसाची मोठी टंचाई भासली होती. मात्र, मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे ऊस क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे गळीत हंगाम जोरात आहे. जिल्ह्यातील सहा सहकारी साखर कारखान्यांनी बुधवारअखेर १,९८,२०० टन उसाचे गाळप करीत १,०३,४८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. तर साखर उतारा ५.२२ टक्के आला. आठ खासगी कारखान्यांनी ३,५८,५१० टन उसाचे गाळप करून १,७२,०६० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखरेचा सरासरी उतारा ४.८ टक्के आहे. भैरवनाथ शुगर, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, भैरवनाथ शुगर, नरसिंह साखर कारखाना, क्वीनर्जी इंडस्ट्रीज, आयन मल्टिट्रेड, नॅचरल शुगर, डीडीएनएसएफऐ, भीमाशंकर शुगर्स, धाराशिव साखर कारखाना, भैरवनाथ शुगर्स, सोनारी लोकमंगल माउली इंडस्ट्रीज, कंचेश्वर शुगर हे कारखाने सुरू आहेत.


















