कोल्हापूर : सहकारी संस्था या देशातील बहुजनसमाज विकासाची खरी मंदिरे आहेत. या संस्था हाच ग्रामीण विकासाचा आत्मा आहे. म्हणूनच सहकारी चळवळ टिकली व वाढली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. संजय ठिगळे यांनी केले. येथील मंडलिक साखर कारखाना व जिल्हा सहकार बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७२ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडलिक कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव फराकटे होते. कारखाना कार्यस्थळावर सहकार ध्वजारोहण उपाध्यक्ष आनंदराव फराकटे यांच्या हस्ते झाले. सहकार गीताचे सामुदायिक गायन करण्यात आले.
यावेळी प्रा. ठिगळे म्हणाले, सहकार क्षेत्राच्या विकासामुळे बहुजन समाजातील अनेक मुले आज उच्चविद्याविभूषित झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील शेतकऱ्यांची सावकारांकडून होणारी पिळवणूक कमी करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले. यावेळी कारखाना संचालक तुकाराम ढोले, भगवान पाटील, जिल्हा सहकार बोर्ड संचालक प्रवीण सूर्यवंशी, दीपक माने, सेक्रेटरी आर. बी. बोंगार्डे, लेबर ऑफिसर शांतिनाथ मगदूम, मुख्य शेती अधिकारी प्रताप मोरबाळे, पर्चेस अधिकारी जयेंद्र कोंडेकर आदी उपस्थित होते. स्वागत लेबर ऑफिसर शांतिनाथ मगदूम यांनी, प्रास्ताविक जिल्हा सहकार विकास अधिकारी एस. एस. देसाई यांनी, तर आभार सुदाम देसाई यांनी मानले.


















