सांगली : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गळीत हंगाम लवकर सुरू झाला आहे. पूर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे. आपण सर्वांनी ऊस तोडणी कार्यक्रमाबाबत कायम दक्ष राहावे. आपण वाफ बचत प्रकल्प हाती घेत आहे, तो पुढील हंगामापूर्वी पूर्ण करू, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले. राजारामबापू कारखान्याच्या साखराळे युनिटमध्ये उत्पादित केलेल्या १ लाख १०१ व्या साखर पोत्याचे पूजन राजारामबापू समूहाचे मार्गदर्शक, आ. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील उपस्थित होते. सुरुवातीला ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
उपाध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला नोंदविलेला सर्व ऊस आपल्या कारखान्यास देऊन सहकार्य करावे. आर. डी. माहुली म्हणाले, आपण १७दिवसात १ लाखावर साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. या हंगामात १२० दिवसात ८ लाख टनाच्या वर उसाचे गाळप करून १२.७५ टक्क्यावर साखर उतारा राखण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी प्रदीपकुमार पाटील, रघुनाथ जाधव, प्रताप पाटील, राजकुमार कांबळे, रामराव पाटील, डॉ. योजना शिंदे-पाटील, दिलीपराव देसाई, माजी संचालक माणिकराव पाटील, कृष्णाचे संचालक अविनाश खरात, पै. विकास पाटील, ए. पी. पाटील यांच्या हस्ते साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविक केले. नीलेश साठे यांनी सूत्रसंचालन केले. बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील यांनी आभार मानले.


















