बीड : ऊस दरबाबत अखिल भारतीय किसान सभा, युवा शेतकरी संघर्ष समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, प्रहार अशा विविध चळवळीतील कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी कामगार, मुकदम, वाहतूक ठेकेदार एकत्र झाले आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील ऊस दर प्रश्न चिघळला आहे. सोमवारी (दि. २४) जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी बेमुदत चक्काजाम आंदोलन होणार आहे. या आंदोलनाची तीव्रता दर्शविण्यासाठी रविवारी जिल्ह्यातील गावागावात टायर जाळून ऊस दराबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
जिल्ह्यातील जवळपास १०० गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी टायर जाळून ऊस कारखानदारांना चक्काजाम आंदोलनात सामील असल्याबाबत इशारा दिला. शेतकऱ्यांनी ऊस कारखानदारांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला प्रशासन आणि साखर कारखानदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रविवारी शेतकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. रस्त्यांवर टायर जाळून ऊस दर व इतर मागण्या संदर्भात घोषणाबाजी करण्यात आली. बेमुदत चक्काजाम आंदोलनात रास्त हमीभाव पदरात पाडून घेण्यासाठी यावे, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


















