पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये बळवंत दोरगे यांनी चारही बाजूने बंदिस्त गुऱ्हाळघराचा प्रयोग साकारला आहे. या गुऱ्हाळघराची दररोज २५ टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. यासाठी दोरगे यांनी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यापूर्वी त्यांनी स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर १५० अत्याधुनिक गुऱ्हाळघरे तयार केली आहेत. या अनुभवानंतर त्यांनी स्वतःचे दर्जेदार व प्रदूषण विरहित गुऱ्हाळघर बनविण्याचा निर्णय घेतला. भांडगाव (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला संपूर्ण स्टीलचे कोटिंग असणारे बंदिस्त, हायजेनिक, स्वयंचलित, रसायन व प्रदूषणविरहित सेंद्रिय गुऱ्हाळघर उभारले आहे. त्यासाठी एक कोटी १५ लाख रुपये खर्च आला आहे.
बळवंत दोरगे यांनी सांगितले की, बंधू ज्ञानेश्वर दोरगे, मेहुणे दीपक शिंदे, पांडुरंग दोरगे, सुजाता दोरगे व सुवर्णा दोरगे यांच्या मदतीने गुऱ्हाळघर बांधले आहे. स्वच्छतेच्यादृष्टीने ३१८ एसएस स्टीलचा वापर केला आहे. यामध्ये फक्त सात कामगारांची आवश्यकता आहे. उसाची ट्रॉली गुऱ्हाळाशेजारी लावल्यानंतर ऊस आपोआप स्वयंचलित यंत्रणेद्वारे गाळपासाठी जातो. त्यानंतर क्रशरद्वारे ऊस गाळला जातो. क्रशरमधून टाकीमध्ये रस जातो. त्यानंतर प्रोसिजर युनिटमध्ये रसावर प्रक्रिया केली जाते. गुळाचे तापमान शेवटपर्यंत ११५ सेल्सिअस ठेवले जाते. दोरगे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात व बाहेरील राज्यात अनेक शेतकऱ्यांना अत्याधुनिक गुऱ्हाळघरे बांधून दिली. स्वतःचे सेंद्रिय गुऱ्हाळघर असावे, अशी इच्छा होती. ही बाब लक्षात घेऊन गुऱ्हाळघर बांधले आहे.


















