कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील पाच कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३,४०० रूपये दर जाहीर केला होता. ही उचल मान्य नसल्याची भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस- ओलम कारखान्यावर रविवार सकाळपासून ठिय्या आंदोलन केले. कारखान्याचे गाळप बंद राहिल्यानंतर आंदोलनाची दखल घेत ओलम कारखाना व्यवस्थापनाने सोमवारी प्रतिटन ३,५०० रूपये पहिली उचल जाहीर केली. यातील १०० रुपये हंगामाच्या अखेरीस अतिरिक्त देण्याचे ओलम अॅग्री कारखान्याने मान्य केले. या घोषणेनंतर स्वाभिमानी शेतकरी आंदोलन मागे घेतले आणि कारखाना सायंकाळी पुन्हा सुरळीत सुरू झाला.
गडहिंग्लज उपविभागातील इको केन, दौलत, ओलम, आजरा आणि आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी कारखाना आदींनी ३,४०० रुपये पहिली उचल जाहीर केली होती. स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्डेन्नावर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हा दर मान्य नसल्याचे सांगत ओलम कारखान्यावर ठिय्या आंदोलन होते. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. आंदोलनात सहभागी शेतकरी संघटनांचे नेते, शेतकऱ्यांनी कारखान्याचे गाळप रविवारी बंद पाडले होते. त्यानंतर ओलम कारखान्याने ३,५०० रूपये पहिली उचल देण्याचे मान्य केले.

















