पुणे : जिल्ह्यात उशीरापर्यंतच्या पावसामुळे ऊस लागवडी संथ, जमिनीला वाफसा येईना

पुणे : जिल्ह्यात दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू अशा तिन्ही हंगामात उसाची लागवड करतात. बहुतांशी शेतकरी दरवर्षी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत आडसाली उसाची लागवड करतात. त्यानंतर पूर्वहंगामी उसाच्या लागवडी केल्या जातात. मात्र, यंदा जोरदार व लांबलेल्या पावसाचा आडसाली ऊस लागवडीला फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी उसाची उशिराने लागवड सुरू केली आहे. आता आडसाली, पूर्व हंगामी लागवडीचा हंगाम संपला असून सुरू उसाच्या लागवडीने वेग पकडला आहे. येत्या काळात सुरू ऊस लागवड झाल्यास या क्षेत्रात आणखी वाढ होईल. पुणे जिल्ह्यात ऊसाचे एकूण १ लाख ३७ हजार १८१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यत जिल्ह्यात आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू उसाची ६७ हजार ४२६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी इतर पिकांच्या तुलनेत उसाकडे शेतकरी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पाहतात. यंदा मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत पावसाने जोरदार हवेली लावली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पानशेत, पवना, कळमोडी, चासकमान, नीरा देवघर अशी काही धरणे शंभर टक्के भरली. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या उजनीत पुरेसा पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत शिरूर, दौड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत लागवड झाली आहे. डोंगराळ असलेल्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत उसाची लागवड झालेली नाही. खेड, पुरंदर, आंबेगाव तालुक्यांत लागवडीचे प्रमाण कमी आहे. धरणांत पाणी मुबलक असल्यामुळे ऊस शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here