पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा २०२५-२६ चा ऊस गळीत हंगाम सुरू झालेला आहे. दरवर्षी उस तोडणी वाहतूक मजूर कुटुंबासहित कारखाना परिसरात आले आहेत. या स्थलांतरित ऊस तोडणी मजुरांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ऊस तोडणी मजुरांची सर्वसाधारण आरोग्य तपासणीमध्ये बी.पी., शुगर आदी तपासणी करण्यात आल्या. तसेच मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये प्रामुख्याने महिलांचे आरोग्यविषयक तपासणी करून त्यांना आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले की, कारखान्याच्या वतीने दरवर्षी कारखाना कर्मचारी व कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांसाठी विविध आरोग्य शिबीर आयोजित केले जाते. राहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा चिंचोलीकर यांनी आरोग्याबाबत महत्त्व विषद केले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नेहा जेधे, डॉ. सुविधा नाईक, डॉ. प्रवीण गजरे, आरोग्य सहायक रत्नमाला ठाकरे, आरोग्य निरीक्षक योगेश पोटे, आरोग्य सेविका रोहिणी चौधरी, श्रीकांत थोरात, तुषार खंडागळे यांनी आरोग्य तपासणीसाठी सहकार्य केले.


















