सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा साखर कारखान्याला सिरपपासून निर्मिती होणारे इथेनॉल मिरज, गोवा व देसुर-बेळगाव या ऑइल कंपनीच्या डेपोना पुरवठा करण्याची निविदा मिळाली आहे. देशात साखरेचे होणारे अतिरिक्त उत्पादन, त्यामुळे साखरेचा दर विक्रीतील अस्थिरता यामुळेच साखरेबरोबरच अन्य फायदेशीर उत्पादनाचा पर्याय डोळ्यांसमोर ठेवून कारखान्याने शुगर सिरपपासून इथेनॉल निर्मिती करण्याचे ठरवले. कारखान्यांना इथेनॉलनिर्मिती हा एक चांगला आर्थिक उत्पादनाचा पर्याय आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली. कारखान्याच्या डिस्टिलरीमधून शुगर सिरपपासून निर्मिती झालेल्या इथेनॉलचा पहिला टँकर बीपीसीएल ऑइल कंपनीच्या मिरज डेपोला रवाना झाला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्ष नायकवडी म्हणाले की, सध्या रेक्टिफाइड स्पिरिट इथेनॉलच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे ऑइल कंपन्यांनी इथेनॉल खरेदीदरामध्ये वाढ करण्याची गरज आहे. ऑइल कंपन्याकडून नुकतेच निविदामध्ये धान्यापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलचा ७२ टक्के, मोलॅसिस व शुगर सिरपपासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलचा २८ टक्के कोटा आला आहे. ही बाब मोलॅसिस व शुगर सिरपपासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या डिस्टिलरींचे नुकसान करणारी आहे. यात बदल करण्याची गरज आहे. सरकारने पूर्वीप्रमाणेच कोटा द्यायला हवा. यावेळी वीरधवल नायकवडी, संचालक विश्वास थोरात, बाळासाहेब नायकवडी, अजित वाजे, संभाजी थोरात, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, गोपाळराव आरखडे, सचिन शिंदे, बाबूसो कोटबागी, ज्ञानेश्वर पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


















