पुणे : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्याप अनेक साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही. शेजारील सातारा जिल्ह्यातील श्रीराम फलटण, श्री दत्त साखरवाडी यांनी ३३०० रुपये दर जाहीर केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. बाहेरील कारखान्यांकडून त्वरित ऊस तोड मिळत असल्याने पुढील हंगाम साधण्यासाठी अनेक जण या कारखान्यांना ऊस देण्याच्या मानसिकतेत आहेत. ऊस परजिल्ह्यात गेल्यास निरा खोऱ्यातील साखर कारखान्यांना ऊस कमी पडू शकतो, अशी स्थिती आहे.
कारखान्यांचा दर जाहीर नसल्याने व ऊस तोडीस विलंब करण्यापेक्षा एक रकमी ३३०० रुपये मिळतात, हे कारखाने दिवाळीला साखर देत असल्याने अनेकांचा कल या कारखान्यांकडे आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. लगतच्या इंदापूर तालुक्यातील छत्रपती कारखान्यावरही पवार यांचीच सत्ता आहे. हे कारखाने दर कधी जाहीर करतात, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.


















