पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाच्या वापराने गती घेतली आहे. त्याला यश मिळताना दिसत आहे. खुटबाव (ता. दौंड) येथील स्थापत्य अभियंता शेतकरी महेंद्र थोरात यांनी दौंड तालुक्यामध्ये प्रथमच ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान वापरत एकरी सरासरी ९५ टन उत्पादन घेतले आहे. थोरात यांचा ऊस दौंड शुगर कारखान्याला गेला आहे. एका उसाला ४० ते ४२ कांड्या आहेत. सध्या दीड एकर क्षेत्रामध्ये १५ महिने पूर्ण वाढ झालेल्या उसाचे १४२ टन उत्पादन त्यांनी घेतले आहे. दौंड तालुक्यात एआय तंत्रज्ञानाचे पहिलेच उत्पादन आहे.
याबाबत उत्पादक शेतकरी महेंद्र थोरात यांनी सांगितले की, एआय प्रणालीमुळे वाऱ्याची दिशा व वेग मोजला जातो. त्यावरून औषध फवारणी व्यवस्थापन करता येते. पिकाला सूर्यप्रकाश किती मिळाला. आर्द्रता किती आहे ते समजते. पावसाचा अचूक अंदाज घेता येतो. पावसाचे मोजमाप समजते. तसेच जमिनीचे तापमान ठरविले जाते. त्यावरून पाणी किती पाहिजे ते ठरविता येते. पाणी जास्त झाल्यास तत्काळ मेसेज येतो. एआय जमिनीतील खताची गरज नत्र, फॉस्फरस, पोटॅश ओळखते व सुधारण्यास मदत करते. या तंत्रज्ञानाचा पहिलाच प्रयोग असल्याने चालू वर्षी समाधानकारक उत्पादन घेऊ शकलो. एका उसाला ४० ते ४२ कांड्या आल्या होत्या. यावर्षी जास्त पाऊस पडल्याने थोडेसे उत्पादन कमी मिळाले. पुढील वर्षी एकरी १२५ उत्पादन घेण्याचा प्रयत्न असेल.


















