सातारा : फलटण तालुक्यातील शेतकरी संघटित झाला असून, यावेळेस उसाला तीन हजार ५०० रुपयांचा दर घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत दत्त इंडिया साखरवाडी आणि जवाहर श्रीराम शुगर या साखर कारखान्यांनी प्रती टन ३,५०० रुपये दर जाहीर करावा, अन्यथा या कारखान्यांसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. साखरवाडी (ता. फलटण) येथे संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील या दोन कारखान्यांच्या शेजारील इतर कारखान्यानी ३,५०० रुपये दर जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यातील माळेगाव व सोमेश्वर कारखान्यांनीही उच्चांकी दर दिला आहे. मात्र, दत्त इंडिया साखरवाडी व जवाहर- श्रीराम शुगर हे कारखाने ३,३०० रुपयांची पहिली उचल जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. या साखर कारखान्यांची जवळपास दीड टक्क्यांनी रिकव्हरी चोरली जात आहे. या परिसरात पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आहे. तेथे उसाची रिकव्हरी लागत आहे. मात्र, त्याला लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. दोन दिवसांत ३,५०० रुपये दर जाहीर न केल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले जाईल.

















