छत्रपती संभाजीनगर: पैठण तालुक्यात बुधवारी (दि.२६) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुळमेश्वर गूळ कारखान्यावर आंदोलन सुरू केले. कारखान्याने थकीत ऊस बिले द्यावीत आणि चालू हंगामाचा दर जाहीर करावा, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी दुपारी गुळमेश्वर गुळ कारखाना नवगाव (ता. पैठण) बंद करून आंदोलन सुरू केले. रात्रीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. उसाला इतर कारखान्यांप्रमाणे दर जाहीर न करणाऱ्या व थकबाकीदार कारखान्यांविरुद्ध आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
तालुक्यातील संत एकनाथ साखर कारखाना, शरद – रेणुकादेवी या साखर कारखान्यांसह गूळ पावडर तयार करणाऱ्या गुळमेश्वर गूळ पावडर निर्मिती कारखाना व शिवाजी गूळ कारखान्यांनी योग्य ऊस दर जाहीर केला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गुळमेश्वर कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकीत दोनशे रुपये वाढीव रक्कम आतापर्यंत जमा करण्यात आली नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष ज्ञानदेव मुळे, संतोष तांबे, अनिल औटे, कल्याण औटे, दिलीप नरके, संदीप भालेकर, एकनाथ दसपुते, ऋषिकेश औटे, गणेश गिर्गे, ज्ञानेश्वर पवार, महेश लांडगे, अण्णा ठाणगे, मुसाभाई शेख, अमोल औटे, बाबूराव बेळगे, सद्दाम सय्यद, सीताराम सुबागडे, प्रमोद वाघ, संतोष गोलटे आदींनी आंदोलन केले. सर्व साखर कारखान्यांनी ३३०० रुपये प्रतिटन ऊस जाहीर करावा, गुळ कारखान्याने दोनशे रुपये दर कमी द्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव मुळे यांनी केली.

















