सोलापूर : जिल्ह्यात थकीत एफआरपी व आर्थिक कारणामुळे अद्यापही १६ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झालेले नाही. त्यामुळे अवघ्या २२ साखर कारखान्यांचे गाळप सुरू असल्याची नोंद साखर आयुक्त कार्यालयाकडे आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत २२ लाख ९५ हजार मे. टन ऊस गाळप केले आहे. गाळप सुरू असलेल्या कारखान्यांमध्ये सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, शंकर सहकारी, विठ्ठल सहकारी गुरसाळे, पांडुरंग श्रीपूर, संत दामाजी मंगळवेढा, धाराशिव साखर (जुना सांगोला), विठ्ठलराव शिंदे-पिंपळनेर, विठ्ठलराव शिंदे-करकंब, संत कुर्मदास, लोकनेते बाबूराव पाटील-अनगर, दि सासवड माळीनगर, ओंकार (विठ्ठल कॉर्पोरेशन) आदींचा समावेश आहे.
गेल्यावर्षी चांगला पाऊस पडल्याने पिकांसाठी पाण्याची अडचण नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली. त्यामुळे यंदा गाळपासाठी ऊस भरपूर उपलब्ध आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडील नोंदीनुसार, जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. या कारखान्यांनी २२ लाख ९५ हजार मे. टन गाळप झाले आहे. जिल्ह्यातील सिद्धनाथ शुगर तिर्हे, येडेश्वरी खामगाव, सीताराम महाराज-खर्डी, ओंकार शुगर चांदापुरी, अवताडे शुगर, युटोपियन शुगर, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ आलेगाव, आष्टी शुगर, व्ही. पी. शुगर, बबनराव शिंदे शुगर हे कारखाने गाळप करीत आहेत. आणखी काही कारखाने ऊस गाळप करीत असले तरी त्याची नोंद साखर सहसंचालक कार्यालयाकडे नाही.


















