सांगली : डफळापूर-कुडनूर (ता. जत) येथील श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी यावर्षीच्या हंगामासाठी ऊस दर ३,३०० रुपये प्रति टन जाहीर केला आहे. त्यातील पहिला ३,२५० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड त्यांनी दिले. २०२५-२६ गाळप हंगामातील १ लाख २१ हजार व्या साखर पोत्यांचे पूजन उत्साहात झाले. यावेळी ते बोलत होते. उर्वरित ५० रुपये दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस श्रीपती शुगरला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यकारी संचालक महेंद्र लाड म्हणाले की, यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने पाच लाख टन गाळपाचा टप्पा गाठण्याचा मानस आहे. सध्या हंगामातील देयकांचे देण्याचे सुरुवात केली असून, शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले. साखर पूजन सोहळ्याचे उद्घाटन भारती शुगर अँड फ्युएल्स, नागेवाडीचे अध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास जनरल मॅनेजर महेश जोशी, शेती अधिकारी सतीश मिरजकर, एचआर मॅनेजर रणजित जाधव, चिफ इंजिनिअर यशवंत जाधव, चिफ केमिस्ट दीपक वाणी. इलेक्ट्रिकल इंजिनिअर आनंदा कदम यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


















