पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामामध्ये शनिवारी (ता. २९) पहाटे सव्वाचारच्या सुमारास दोन लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास १ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. गळीत हंगामामध्ये संचालक मंडळाने १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याने १६ व्या दिवशी एक लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला होता. तर २९ व्या दिवशी पहाटेच्या सुमारास दोन लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. कारखाना क्षमतेपेक्षा अधिक गाळप करीत असून प्रतिदिन ८ हजार टनापेक्षा अधिक उसाचे गाळप सुरू आहे.
कारखान्याने २८ नोव्हेंबरअखेर १ लाख ९९ हजार ९३८ टन उसाचे गाळप आणि १ लाख ९४ हजार ८०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. कारखान्याची सरासरी रिकव्हरी १०.१० टक्के असून शुक्रवारची रिकव्हरी ११.०८ टक्के होती. तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ५९ लाख ३२ हजार युनिट विजेची महावितरणला निर्यात केली आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी संचालक मंडळावर विश्वास ठेवून कारखान्याला ऊस देत आहेत. कारखान्यातील अधिकारी, कामगार ही चांगले काम करीत आहे. सर्वांनी एकत्र काम करून १२ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण करू, अशा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी व्यक्त केले.

















