परभणी : अखिल भारतीय ऊस उत्पादक शेतकरी समितीच्या नेतृत्वाखाली शनिवारी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी ऊस दरासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रेणुका शुगर साखर कारखान्याने २,९६२ रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. मात्र, कारखाना प्रशासनाकडून उसाची रिकव्हरी लपवली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. कारखान्याने शेतकऱ्यांना परवडेल असा भाव जाहीर न केल्यास ऊस वाहतूक बंद पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वरील पोखर्णी फाट्यावर सकाळी ११.४५ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत झालेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली.
महसूल व पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारखाना प्रतिनिधींशी संपर्क साधला. रेणुका साखर कारखान्याचे प्रशासनातील कर्मचारी यांनी ऊस दरा संदर्भात लेखी स्वरूपात पत्र दिल्यानंतर आंदोलकांनी वाहनांसाठी रस्ता मोकळा करून दिला. आंदोलनात तालुक्यासह जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे नेते, माजलगाव तालुक्यातील शेतकरी, सांगली जिल्ह्यातून आलेले शेतकरी नेते सहभागी झाले होते.आंदोलनस्थळी अनेक आंदोलक शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या नेतृत्वात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महामार्गांच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
















