सांगली : भारती शुगर्स (नागेवाडी) कारखान्याकडून गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये नोव्हेंबरअखेर गाळपास आलेल्या उसाचे बिल प्रतिटन ३३०० रुपयांप्रमाणे ऊस पुरवठा केलेल्यांच्या खात्यावर जमा केले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी केले.कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गळितास आणण्यासाठी सक्षम तोडणी, वाहतूक यंत्रणा कार्यरत आहे, असे लाड यांनी सांगितले.
अध्यक्ष ऋषिकेश लाड म्हणाले, शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधल्यास त्या समस्येचे निराकरण करण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहणार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन लाड यांनी केले आहे. कारखाना परिसरातील ऊस क्षेत्रातही वाढ झाल्याने त्या प्रमाणात ऊसतोड मजुरांची जुळवाजुळव करून कार्यक्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी यंत्रणा कार्यरत करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनीही प्रशासनाकडे केलेल्या नोंदणीनुसार नंबर येतील, त्याप्रमाणे ऊसतोडीस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी केले.


















